Wednesday, April 13, 2011

स्वछन्दि

धावत राहावे सगळे सोडून
ना दिशा ना वेळ
ना सोबती ना कारण
कशाचीच परवा न करता

हसत राहावे नुसते कधीतरी
ना सोबती ना कारण
ना भीती ना बोच
कशाचीच परवा न करता

लिहीत राहावे पानांवर पाने
ना भीती ना बोच
ना विषय ना शब्द
कशाचीच परवा न करता

बोलत राहावे दिवस आणि दिवस
ना विषय ना शब्द
ना राग ना लोभ
कशाचीच परवा न करता

ओरडत राहावे असेच कधी
ना राग ना लोभ
ना आवाज ना परिणाम
कशाचीच परवा न करता.

-अदिती

Saturday, June 12, 2010

तू अन् मी..

आभाळ दाटून येते, तसेच मन ही,

रिमझिम बरसणार्या धारा.. चिंब भिजणारे तू अन् मी...

कडाडणारी वीज, मस्त गार वारा,

सप्तरंगी इंद्रधनू.. रंगवणारे तू अन् मी...

थेंबांचे संगीत, नाचणारी पाने,

ओल्या मातीचा गंध.. अनुभवणारे तू अन् मी...

उंच उंच डोंगर, घोंगवत येणारा वारा,

घरट्याबाहेर निघणारी पाखरे.. उडणारे तू अन् मी...

होऊन गेलेला पाऊस, मोकळे निरभ्र आकाश,

गप्पांचे रंगलेले फड.. बरसणारे तू अन् मी...

भरतीचा समुद्र, पायाखाली सोनसळी वाळू,

मावळणारा सूर्य.. विरघळणारे तू अन् मी...

Saturday, December 19, 2009

Miss You..

Miss You..
किती भाव दाटलेले असतात
या दोन शब्दात..
अर्थ जेव्हा जाणवला
तेव्हा पाणी होतं डोळ्यांत

कोणाची कधी इतकी आठवण येईल
भेटण्यासाठी मन कासावीस होईल
बघण्यासाठी डोळे आतुर होतील
कान फ़क्त त्याच आवाजाचा वेध घेतील
खरंच कधी वाटलं नव्हतं

भविष्यात काय आहे..
नाही जाणून घ्यायचे आत्ताच
हा क्षण जगायचा आहे
फ़क्त तुझ्याच सहवासात..


-अदिती

ते झाड..


खुणावायचं ते झाड सार्या वाटसरूना
फक्त माझ्यासाठी, म्हणून कोणीतरी या
जबरदस्ती नाही माझी, खरंच
पण एखादं पान आठवण म्हणून घ्या
खूपकाही सांगायचय तुम्हाला
सगळं सगळं बोलून मोकळं व्हायचंय
तुम्ही निघून जाणार पुढे पण,
मला मात्र इथेच उभं राहायचं
कोणालाच नाही समजलं कधी
काय बोलायचं होतं त्या झाडाला
वाटच पहात राहिलं वेडं
समाजलही नाही अंत जवळ आलेला
आता काय सांगायचं? कशाला बोलायचे?
सअंपलेच तर आहे आता सार...
उभ झाडच पडलय उन्मळून
माळावर नुसतंच घोम्गावाताय वारं..

-अदिती

Saturday, June 14, 2008

पुढे...?


खुप गोंधळुन टाकतय नवं नातं
सवय नाही आहे या गोंधळाची,
म्हणुनच कदाचित नको वाटतय...
की भीती वाटते आहे काही गमवायची ?

किती मोकळं होता येतं मैत्रीमध्ये
ती मोकळीक नव्या नात्यात असेल ?
खात्री नाही वाटत आहे या गोष्टीची
मनातलं बोलायचं स्वातंत्र्य नक्की असेल ?

अशाच रंगत जातील का गप्पा
काहीही विषय बोलायला नसताना ?
की नुसतेच शांत रहावे लागेल
खुपसे विषय साचलेले असताना ?

निखळ मैत्रीच होती आजपर्यंत
कधी वेगळा विचारच केला नाही
जरुरीच नव्हती कधी पुढच्या पाऊलाची
आणि खरंच अजुनही वाटत नाही...!

Sunday, March 30, 2008

प्रश्न

टपटपणारे थेंब अन कोसळणारा पाऊस
दोनही गोष्टी कशा होणार एकत्र ?
मग नव्याचं सुख अन जुन्याचं दु:ख
हे कसं एकाच वेळी जाणवतं ?

हळुवार झुळुक आणि सोसाट्याचा वारा
एकदम अनुभवता येईल का कधी ?
पण होऊन गेलेले आनंदी क्षण
कसे आणतात डोळ्यामध्ये पाणी ?

टिमटिमणारे तारे अन पॉर्णिमेचा चंद्र
दोन्हीसुद्धा तितकेच मोहवुन टाकणारे
आपल्यासाठी टिमटिमणारा ताराच बळी देतो
तरी चंद्रावर जीव ओवाळतात सारे

काहीच ताळमेळ नाही कशाचा
तरिही सारे जुळलेले दिसते
असेच असते का जीवनसुद्धा
धागे गुंतलेले तरी त्यातच जगावेसे वाटते..!

-aditi

Sunday, March 9, 2008

नाती...

वर्तमानातल्या नात्यांचं भविष्य
का नाही वर्तमानातच दिसत ?
न सुटणारा गुंता बघत राहणं
हातात उरतं फ़क्त एवढचं..

काही नाती खुप हवीहवीशी असतात
पण कायम सोबत नाही राहत
का नाही जाउ शकत सारं बरोबर घेउन ?
प्रत्येकासाठीच्या वाटा एकच का नाही असत?

प्रत्येक वळणार्या नव्या वाटेवरती
डोळ सदैव पाणावलेलेच असतात
तीच भावना, तेच दु:ख, तोच त्रास
दरवेळी व्यक्ती मात्र बदललेल्या असतात





राहुन राहुन वाटतं नेहमीच,
पुढच्या वळणावरती हे बदलायला हवं
नवनवीन धागे रेशमी बंधांचे हे
त्यांना जपून ठेवणं जमायलाच हवं...

-aditi

Friday, February 22, 2008

नवलाई



नव्या जगातले नवे रुतु,
किती पटकन रंग बदलतात,
आपण ग्रुहित धरतो खुपकाही,
पण सारे संदर्भच वेगळे असतात

पुढे जाता जाता मधुनच
एखादे खुसपट मागे ओढते
साधेसे शब्दही जिव्हारी लागतात
अन डोळ्यांमध्ये टचकन पाणी भरते

ओळखीची वाटणारी माणसे
मोक्याच्या क्षणी खुप विचित्र वागतात
आश्चर्याशिवाय काहीच उरत नाही
आठवणी मात्र मनात रुतुन राहतात

वेगळेच आहे बरेचकाही इथे
तरिही खुपकाही आपलेसे वाटते
अनोळखी चेहर्यावरचे साधेसे हास्यही
नकळतच विश्वास देउन जाते


-aditi

Friday, November 30, 2007

जाणीव..

मायेच्या आपल्या माणसांमधे
जीवन किती सुरक्षित भासतं
आखलेली चॉकट,ठराविक माणसं
यांतच सारं आभाळ सामावलेलं असतं




एक नवं आभाळ बोलावतय
क्षितिजाच्या पार उडायला
वारयाचे दोर आहेत जिथे
हिंदोळ्यावर मुक्तपणे झुलायला

झोका देणारे हात असतिल
अन कदाचित तो थांबवणारेही
उडायची दिशा दाखवणारे असतील
तसेच, उडू न देणारेही...

तरिही तिथे जाऊन बघायचे आहे
नवनवीन अनुभव घेण्यासाठी
काहीही होवो तिथे, चांगले किंवा वाईट
माझं आभाळ नेहमीच असेल,परतण्यासाठी...!

aditi

Monday, November 26, 2007

माझ्यासाठी...

सोनेरी कवडश्यांमागे धावताना
चमचमत्या तार्याकडे तटस्थपणे पाहीलं
आज कळतय पण,
त्यानं आपलं अस्तित्व वाहीलं
माझ्या क्षुल्लक इचछेच्या पूर्तीसाठी...

मुसळधार कोसळणारा पाऊस
आडोशाखालून किती नकोसा वाटला
आता उमगतय,
सर्वस्व झोकून तो बरसत होता
क्षणात हर्षविणारं इंद्रधनु मला दाखवण्यासाठी...

प्रचंड गर्दी वाहणारा तो रस्ता
पार होण्यासाठी उगाचच वेळ घ्यायचा
आज समजतय,
तो अखंड अडथळे आणायचा
मला प्रयत्न करताना पाहण्यासाठी...

शब्द ऍकण्यासाठी कान आसुसलेले असताना
सभोवताली किलबिलाट नकोसाच वाटला
आज जाणवतय,
किलबिलाटाचं कारणच ते असेल
आपणच उडून जायला हवं होतं, त्यांच्या एकांतासाठी...